Tuesday, 15 September 2020

कथा फसव्या मार्कांची आणि व्यथा विद्यार्थ्यांची

यावर्षीच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन.

आपल्या पाल्यानी निश्चित चांगला अभ्यास केलेला आहे. 
मात्र यावर्षी ज्या पद्धतीने सरसकट गुणांची उधळण केली आहे, त्यावरून शिक्षण मंडळाच्या उद्देशावर शंका घेण्यास वाव आहे. 
हे सढळ हाताने वाटलेले हे मार्क्स म्हणजे पाल्य आणि पालकांसाठी लावलेला ट्रॅप आहे. मी तुम्हाला विनंती करेन की या ट्रॅप मध्ये अडकू नका.
नंबर्सला फसू नका. कारण सध्याचे अभियांत्रिकी विद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, मॅनेजमेंटची महाविद्यालये. ही कोणातरी राजकीय नेत्यांची, उद्योजकांची मालकीची आहेत.
आणि ही महाविद्यालये एखाद्या कारखान्याप्रमाणे चालवली जातात.ज्याप्रमाणे कारखान्यात कच्चा माल आणून त्यावर प्रक्रिया करून तो  पक्का माल बनवून बाजारात विकायला पाठवला जातो तद्वतच  हजारोंच्या संख्येने विद्यार्थी ऍडमिशन घेतात. आणि दरवर्षी हजारोंच्या संख्येने इंजिनियर्स, डॉक्टर, शिक्षक, एमबीए अशा पदव्या वाटप करून बेरोजगार तरुण बाजारात पाठवले जातात.या कॉलेज नामक कारखान्याला लागणारा कच्चा माल म्हणजे हे ढिगाने मार्क्स देऊन विद्यार्थी नामक पीक काढले जाते. आणि याचाच पुरवठा कॉलेजेस ला होतो.एखादया वर्षी ऍडमिशन ला विद्यार्थी संख्या घटली की हे उद्योजक, राजकीय  नेते संस्थाचालक शिक्षण मंडळाला मॅनेज करतात, मग त्यावर्षी मार्कांचा पाऊस पाडला जातो. विद्यार्थी आणि पालक हे ढीगभर मार्क्स बघून हरखून जातात. मग श्रीमंत पालक आपल्या पाल्याला अशा7च कोणत्यातरी जिथे प्रवेश परीक्षा नसेल किंवा नाममात्र असेल अशा ठिकाणी संस्थाचालक मागतील ती रक्कम देऊन इंजिनियरिंगला, मॅनेजमेंटला ऍडमिशन घेऊन देतात. 
बर यामध्ये गरीब पालकही मागे नसतात तेसुद्धा पाल्याचे मार्क्स बघून हुरळून गेलेले असतात मग अगदी त्यांचा स्वाभिमान वगैरे उफाळून येतो आणि म्हणतात, माझा मुलगा प्रचंड हुशार आहे, मार्क्स बघा त्याचे, मला कुठे गहाण राहण्याची वेळ आली तरी चालेल पण त्याचे उच्चशिक्षण पूर्ण करेन.
हॉस्पिटल मध्ये रुग्णाचा नातेवाईक डॉक्टरसमोर जितका हतबल असतो तितकाच किंबहुना जास्त हतबल विद्यार्थ्यांचा पालक संस्थाचालकांसमोर हतबल असतो. पालकांना सांगितले जाते बघा यावर्षी महाविद्यालयात या शाखेच्या इतक्या इतक्याच सीट्स आहेत, तुमच्या पाल्याला चांगले मार्क्स आहेत म्हणून आम्ही सहानुभूतीपूर्वक तुमचा विचार करतोय. तुम्हाला इतरांपेक्षा कमीच डोनेशन मागितले आहे. अमक्या तमक्याला तुमच्यापेक्षा खूपच जास्त डोनेशन भरायला लागले आहे. बघा तुमचा पाल्य हुशार आहे आता जास्त विचार नका करू. अशा पद्धतीने एकदाचा विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात प्रवेश होतो. 
आणि मग सुरू होते विद्यार्थ्याची  ससेहोलपट..
आई वडिलांनी मार्क्स पाहून प्रचंड अपेक्षा वाढवलेल्या असतात. ते स्वप्ने पाहायला चालू करतात.
शैक्षणिक वर्षाचे एक दोन सेमिस्टर अभ्यासक्रमाची ओळख होण्यात आणि नवनवीन मित्र मैत्रीण याच्यात हसत खेळत जातात. पन्नास साठ हजार रुपयांचे महागडे क्लासेस लावले जातात.

थोडा काळ सरल्यावर हळू हळू वास्तवाची जाणीव व्हायला लागते, आपली आवडनिवड, बुद्धिमत्ता, कौशल्य आणि घेत असलेले शिक्षण यात तफावत असल्याची जाणीव व्हायला लागते, तोवर एक वर्ष निघून गेलेले असते.
मग जाणवायला लागते की अरे हे शिक्षण झेपत नाहीये. इंग्रजी , किंवा गणित असे विषय डोक्यावरून जात आहेत. किंवा हे आपल्याला आवडत नाहीये. हे आपल्याला व्हायचच नाहीये. किंवा मी जास्त मार्क्स बघून चुकीचे क्षेत्र निवडून बसलोय.
मग हळूहळू ही तक्रार व्यथा बनून जाते.


यातून मग ज्यांची घरी आर्थिक सुबत्ता असेल ते खाली मान घालून आई वडिलांना व्यथा सांगून साईड बदलून घेतात आणि धोपट मार्ग म्हणून कला किंवा वाणिज्य शाखेला पहिल्या वर्षांपासून प्रवेश घेतात.

गरीब विद्यार्थी मात्र आतल्या आत घुसमटत राहतात. एकतर पालकांनी मोठ्या अपेक्षेने पोटाला चिंमटे काढून जीवाचा आटापिटा करून महाविद्यालयात डोनेशन भरून ऍडमिशन घेऊन दिलेले असते. ते ऐकून घेतील की नाही, समजून घेतील की नाही ही भीती मनात तयार होते. अभ्यासक्रमातील विषय डोक्यावरून जात असतात. मग विषय जायला लागतात.दहावीच्या मार्कांचा आणि चालू अभ्यासाचा मेळ बसत नाही. अरे आपले मार्क्स तर एवढे जास्त, आपण एवढे हुशार मग हे आपल्याला का समजत नाही, हळूहळू आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. आई वडीलांपासून मार्क्स लपवणे, मानसिक तणाव वाढणे, डिप्रेशन.. क्वचित प्रसंगी व्यसनाधीनता किंवा आत्महत्या..

हे प्रकार जर टाळायचे असतील मार्कांच्या ट्रॅप मध्ये अडकू नका.

सध्या एक ट्रेंड असा चालू आहे की विद्यार्थ्याला त्याचे करियर निवडू द्या, त्याचा निर्णय त्याला स्वतःला घेऊ द्या, पण माझ्या मते पालकांनी ज्या पाल्याला आपण जन्म दिलेला असतो ज्याला पंधरा सोळा वर्षे आपण वाढवलेला असतो त्याचे गुणावगुंण पालकांना माहीत असतात. त्याची ताकद कुठे आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत, हे आपण जाणत असतो. एकूणच आपण आपल्या पाल्याला त्याच्यापेक्षा जास्त ओळखत असतो. साधारण पंधरा वर्षे वयापर्यंत आपला पाल्य बाहेरच्या जगात पडलेला नसतो, त्याला जगाची, विविध क्षेत्रांची तितकीशी ओळख नसते.पाल्य करियर निवडतो म्हणजे काय तर मार्क्स जास्त आहेत मला मेडिकल फिल्ड मध्ये जायचंय तर मी सायन्सला जाणार, चालू ट्रेंड प्रमाणे इंजिनियरिंगला स्कोप आहे तर मी इंजिनियरिंगला जाणार, किंवा माझे मित्र मॅनेजमेंट करणार आहेत मग मी तिकडेच जाणार. हे पाल्याचे करियर किंवा शिक्षण शाखा निवडण्याचे निकष असतात.(यामध्ये काही सन्माननीय अपवाद असतील ज्यांनी अगदी अचूक स्वतःला साजेशी शिक्षण शाखा निवडली)

एकंदर हा लेख लिहिण्याचा मूळ उद्देश हाच आहे की हे आपल्या पाल्याचे मार्क्स फसवे तर नाहीत ना हे एकदा कठोर परीक्षण करून घ्या. केवळ मार्क्स वरती त्याचे करियर न ठरवता त्याची आवड, त्याचे कौशल्य, त्याची बुद्धिमत्ता, त्याच्या मर्यादा या सर्व बाबींची सांगड घालून त्याच्यासमोर विविध पर्याय ठेवा. मग त्यातून त्याला निवड करू द्या. यातून पाल्य जी निवड करेल त्या वाटेने जाताना तो आवडीने व जिद्दीने करियर करून स्वतःचे भविष्य घडवेल. 

पुन्हा एकदा पाल्य व पालकांचे अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..

महेशमानस..

Thursday, 10 September 2020

मोठ्यांच्या मोठया गोष्टी.. अकियो मोरीता

मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी 
अकियो मोरीता..

दहाएक दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी न्यूज मीडिया समोर लोकांना संबोधीत करत होते. त्यावेळी त्यांनी उद्योजकांना विनंती केली की सध्या कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला कठीण काळ आलेला आहे. उद्योगांना काही दिवस मंदीचा सामना करावा लागेल तरीही मानवतावादी दृष्टिकोन ठेवून उद्योजकांनी कामगारांना कामावरून कमी करू नये.
मोदींनी त्यांच्या परीने विनंती केली.
मोदींचे भाषण संपते ना संपते तोवरच एका मराठी न्यूज चॅनेलने उद्योग जगतातील काही तज्ज्ञ मंडळी बोलावली व मोदींच्या या आवाहनावर सविस्तर चर्चा घडवून आणली. 
त्यातील एक औद्योगिक धोरणांमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीचे मत होते की व्यवसाय हृदयाने करता येत नसून डोके लावून करावा लागतो. उद्योग व्यवसाय करायचा म्हणजे प्रॅक्टिकल राहावे लागते. कमी उत्पन्नासाठी जास्त मनुष्यबळ लावणे आणि उद्योगाच्या मंदीच्या काळात आवश्यकतेपेक्षा जास्त मनुष्यबळ वापरणे म्हणजे बॅड बिजनेस असे त्या तज्ज्ञांचे मत होते.
मला या औद्योगिक क्षेत्राबद्दल व अर्थव्यवस्थेबद्दल अगदी जुजबी ज्ञान आहे. त्यामुळे या तज्ज्ञांचे मत मला खोडून वगैरे काढायचे नाही. पण हे चर्चासत्र पाहिल्यानंतर मला माझ्या वाचनात आलेल्या एका जपानी उद्योजकाची आठवण झाली. त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो.

इसवी सनाचे विसावे शतक उजाडले आणि उगवत्या सूर्याच्या देश जपानला जाणीव झाली की पाश्चिमात्य जगातील साम्राज्यवादाचे आणि भांडवलवादाचे आक्रमण थोपवायचे असेल तर आपला देश सर्व औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असायला हवा.म्हणून जपानच्या सम्राटाने तेथील श्रीमंत लोकांना उद्योग व्यवसायात उडी घेण्याचे आवाहन केले.
जपानी सम्राटाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो लोक उद्योग उभारायला लागले. त्यापैकीच एका सामुराई घराण्यातील तरुणाने 1926 साली आपल्याजवळचे सर्व भांडवल वापरून रेडियोचा एक छोटेखानी कारखाना काढला.
सुरुवातीला अगदी 20 ते 25 लोकांचे युनिट उभे केले. उद्योग जरा कुठे उभाच राहत होता तोवर अमेरिकेच्या कृपेने जगावर ग्रेट डिप्रेशन म्हणजेच जागतिक महामंदीचे संकट उभे राहिले. तोपर्यंत जपानही जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनल्याने या जागतिक महामंदीची झळ थेट जपानी अर्थव्यवस्थेला बसली. जपानचे शेकडो उद्योग तोट्यात जायला लागले. हळूहळू बंद पडायला लागले. 
या सामुराई तरुणाला काही मित्रांनी व औद्योगिक क्षेत्रातील माहीतगारांनी सल्ला दिला की काही दिवस तुझ्या कामगारांना ले ऑफ दे, म्हणजेच तात्पुरते थोडे दिवस बिनपगारी घरी बसव. परिस्थिती जर नाहीच सुधारली तर त्यांना परत नको बोलावू आणि जर परत चांगले दिवस आले तर त्यांना परत बोलव.
त्यावर हा सामुराई  म्हणाला मी जर या कामगारांच्या कुटुंबाची भविष्यातील चरितार्थाची हमी देऊ शकत नसेल तर मी त्यांना कामावरून घरी बसवू शकत नाही.
मी अन्नाचा शेवटचा घास खाईपर्यंत माझे कामगार माझ्यासोबत जेवतील. हे कामगार म्हणजे माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत.आणि यांना उपाशी ठेवण्यापेक्षा मी हाराकीरी करेन.( हाराकीरी ही स्वाभिमानी सामुराई  लोकांची एक भयंकर परंपरा आहे. एखादी अक्षम्य चूक झाली असेल किंवा युद्धात पराजय झाला असेल तर भर चौकात गुडघ्यावर बसून स्वतःच्या हातात तलवार घेऊन स्वतःच बेंबीपासून पोट फाडत कडेपर्यंत तलवार आणायची आणि शांतपणे वेदना सहन करत मृत्यू स्वीकार करायचा.)
                 ( अकीयो मोरीता)
स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून या तरुणाने कामगार काही काढले नाहीत किंवा घरी पाठवले नाहीत. वेळप्रसंगी स्वतः नफा न कमावता कामगारांचे वेतन जमेल तसे देत राहिला. रेडिओचा कारखाना सुद्धा कसाबसा तग धरून राहिला. 1932 ते 33 च्या दरम्यान महामंदी हटली जपानी उद्योगधंदे पुन्हा जोमाने चालायला लागले. कामगारांना आपल्या मालकाने केलेल्या उपकाराची जाणीव होती. त्यांनी जीव ओतून कारखाना वाढवला. 1946 साल येता येता या छोट्या कारखान्याचे रूपांतर  कंपनीत झाले. नंतर नंतर या कंपनीने इतर इलेकट्रोनिक उपकरणांचे उत्पादन सुरू केले.
थोड्याच अवधीत ही कंपनी इलेकट्रोनिक उत्पादनात जगात क्रमांक एकची कंपनी झाली.उत्पादनाच्या दर्जाच्या बाबतीत जपानच काय पण युरोप अमेरिकेतील कंपन्यांनाही या कंपनीच्या जवळपास सुद्धा जाता आले नाही. आजही जगभरात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील सर्वात बलाढ्य कंपनी म्हणून या कंपनीला ओळखले जाते. 
इथपर्यंत वाचता वाचता तुम्हाला ही कंपनी कोणती ते समजले असेलच. नसेल लक्षात आले तर सांगतो ही जपानी इलेक्ट्रॉनिक कंपनी म्हणजे #सोनी_कॉर्परेशन आणि या कंपनीचा मालक म्हणजे आकीयो मोरिता.
मला वाटते की आकीयो मोरिता ने ज्याप्रमाणे संकटकाळी आपल्या कामगार कुटुंबाचा हात न सोडता घट्ट धरून ठेवला त्याप्रमाणे भारतीय उद्योजकांनी आपल्या कामगारांना अशा कठीण काळात बेरोजगारीच्या दरीत न लोटता त्यांना विश्वासात घेऊन पूर्ण वेतन किंवा अर्धे वेतन देऊन जमेल तसे त्यांचा सांभाळ करायला हवा. नंतर हेच कामगार पूर्ण निष्ठेने तुमचा उद्योग व्यवसाय भरभराटीला आणतील. 
मला वाटते की माणूस नेहमीच डोक्याने विचार करतो. त्याने कधीतरी ह्रदयातून आलेल्या आवाजाचाही विचार करावा.

महेशमानस...

Sunday, 6 September 2020

मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी...लेस ब्राउन

 

मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी
लेस ब्राउन..

मित्रांनो आज मी तुम्हाला एका असामान्य अवलियाची गोष्ट सांगणार आहे..
या लेस ब्राउन ची गोष्ट त्याच्याच शब्दात ऐकताना आपले डोळे पाणावतात.
1945 साली जन्मलेला हा अमेरिकन कृष्णवर्णीय लेखक, विचारवंत, मोटीवेशनल स्पीकर. लेस ब्राउनला लहानपणी जन्मदात्या आईने टाकून दिले व दुसऱ्या एका कृष्णवर्णीय गरीब स्त्रीने त्याला सांभाळले. त्या सांभाळणाऱ्या स्त्रीने जिचे नाव मॅमी ब्राउन होते तिनेच लेस ला लेसली ब्राउन हे नाव बहाल केले. मॅमी ब्राउन अतिशय मायाळू परंतु खंबीर स्त्री होती. तिने लेसली सोबत सात मुले दत्तक घेऊन सांभाळली होती.दिवसभर ती श्रीमंतांच्या घरी धुणे भांडी, स्वयंपाक करत असे. श्रीमंत लोकही घरातील उरलेले अन्न मॅमीला घरी नेण्यास देत असत. मॅमी हे मागून आणलेले अन्न खायला घालून मायेने सात लेकरे सांभाळत होती.
लेस ब्राउनला साहजिकच या पालक आईबद्दल खूप म्हणजे खूप प्रेम होते.
लेस ब्राउन ने ठरवले की आपण मोठे झाल्यावर आईच्या कष्टाचे पांग फेडायचे, आईला खुप सुखात ठेवायचे. लेस ब्राउन थोडा वयाने मोठा व्हायला लागला. अजून जगाला लेस ब्राउनची ओळख व्हायची होती. तो एक सामान्य माणसाचे आयुष्य जगत होता. थोडेसे पैसे कमवायला लागल्यावर लेस ला वाटले आईचे आयुष्य लिबर्टी सिटी सारख्या झोपडपट्टी एरियात छोट्या घरात गेले, तेंव्हा आता छान थोडेसे मोठे घर घ्यावे. म्हणून त्याने जवळच्याच उपनगरात एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर मोठे घर घेतले. तो खूप खुश होता. आईला त्याने घर दाखवले आईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.आईला घेऊन तो नवीन घरात राहायला आला. त्याच दिवशी त्याला जवळच्याच बँकेतून भेटण्यासाठी निरोप आला. त्याला बोलावण्याचे कारण समजेना तो बँकेत गेला तिथे गेल्यावर बॅंकेच्या मॅनेजरने लेस ला बसायला खुर्ची दिली व त्याला सांगितले तुम्हाला पंचावन्न हजार डॉलर भरावे लागतील तरच तुम्हाला त्या नवीन घरात रहाता येईल.पण लेस म्हणाला मी तर रोखीने पैसे देऊन घर खरेदी केलंय. मी जास्तीचे पैसे कोणाला का देऊ, तर बँकेचा आधिकारी म्हणाला घराच्या जुन्या मालकाने ते घर पंचावन्न हजार डॉलर कर्जासाठी तारण ठेवले होते तेंव्हा आता ते कर्जाचे पैसे तुम्हाला भरावे लागतील जर भरू शकणार नसाल तर तुम्हाला घर खाली करावे लागेल. लेसने घाईने त्याच्या वकिलाला बँकेत बोलावून घेतले वकील आल्यावर बँकेच्या अधिकाऱ्याने वकिलाला कर्जाच्या तारणाची कागदपत्रे दाखवली. लेस ब्राउनचा वकील म्हणाला लेस खरच तुला फसवलं गेलंय. लेस म्हणाला पण तो माणूस खूप चांगला वाटला तो म्हणाला या घरावर काहीही कर्ज नाहीये तो माणूस खरच चांगला वाटला मला, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मी, म्हणून मी घराची कागदपत्रे पाहिलीच नाहीत. बँकेतील इतर कर्मचारी लेस कडे असे पाहायला लागले जणू काही कसलं येड आहे हे. लेस आता रडकुंडीला आला. लेस म्हणाला बर पण मला घराबाहेर काढू नका मी भरतो सर्व डॉलर पण मला जरा वेळ द्या. सहा महिने वेळ द्या मला. बँकेचे अधिकारी चांगलेच आडून बसले ते म्हणाले तुला आम्ही फक्त आठ दिवस देतो त्याच्या आत तुला सर्व पैसे भरावे लागतील. अहो पण माझ्या आईची तब्येत बरी नसते हो, मला थोडा तरी वेळ द्या ना मी पाच हजार डॉलर प्रति महिना हप्त्याने तुमचे कर्ज फेडतो पण मला घराबाहेर काढू नका. हे घर माझ्या आईचे स्वप्न आहे हो तिला खूप मोठा धक्का बसेल. पण बँकेचे अधिकारी काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी शेवटची तंबी दिली एका आठवडयात पैसे द्या नाहीतर घर खाली करा. शेवटी लेस म्हणाला मग मी घरासाठी भरलेले माझे पसे तरी द्या त्याच्या या वाक्यावर सर्व बँक हसली, लेस ब्राउन सैरभैर झाला. लेसचा वकील म्हणाला तो घराचा मालक तुझे पैसे घेऊन पळून गेलाय, त्याने तुला फसवलंय. आता ते पैसे बँक कसे देईल.
लेस मनात दुःख भरून डोळे पाणावलेल्या अवस्थेत घरी आला. तिथून पुढे सहा सात दिवस तो पैसे कुठून जुळतात का हे पाहत प्रयत्न करत राहिला. एवढी मोठी रक्कम जमा होणे शक्य नव्हतेच. सातव्या दिवशी रात्री बेचैन अवस्थेत तो घराच्या दिवाणखान्यात येरझरे घालत राहीला. रात्रभर विचार करू लागला उद्या तर घर सोडावे लागेल याबद्दल आईला कसे सांगावे, रात्री तीन वाजता तो आईच्या बेडरूम जवळ गेला बाहेरून त्याने आईला आवाज दिला व आत गेला, त्याने आईला उठवून बसवले आईसुद्धा जागीच असलेली पाहून लेसने आईला विचारले तू आजून जागीच कशी ग? आई म्हणाली तू बाहेर बेचैन पणे येरझरे घालत होतास नक्कीच काहीतरी टेन्शन असेल तुला. म्हणून मलाही झोप येत नव्हती. लेस ब्राउन आईसमोर गुढग्यावर बसला त्याचे डोळे दुःखाने लाल झाले होते. आई लेसला म्हणाली न घाबरता न संकोचता मला सांग काय झालं ते, लेस म्हणाला आई उद्या आपल्याला हे घर सोडावे लागेल.आई ने विचारले का रे? लेस म्हणाला आई ज्याने मला हे घर विकले त्याने मला फसवले आहे. या घरावर पंचावन्न हजार डॉलरचे कर्ज काढले व माझे पैसे घेऊन पळून गेलाय आता बँक मला पैसे मागतीये बँकेने मला आठ दिवसात पंचावन्न हजार डॉलर भरायला सांगितले होते पण मी पैसे गोळा नाही करू शकलो. आता उद्या आपल्याला हे घर सोडावे लागेल.
लेसच्या आईचा मॅमी ब्राउनच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले.आईचा चेहरा हसरा झाला व आई म्हणाली अरे बरच झालं की मग, नाहीतरी हे घर मला आवडेलच नव्हते. दिवसभर खालून वर जाऊन यायचे म्हंटले तरी माझे घुडघे दुखून येत होते. मला गुडघ्यामुळे खाली जावसं वाटतच नव्हते. म्हणून दिवसभर मी या घरातच जेलमध्ये बंद झाल्यासारखी झाले होते. आणि इथे कोणी माझ्या मैत्रिणी सुद्धा बनत नव्हत्या. बर झालं जे झालं ते, आपण परत लिबर्टी सिटी एरियात जाऊ राहायला, तिथे माझ्या कितीतरी जुन्या मैत्रिणी आहेत ज्यांच्यासोबत माझा दिवस अगदी छान जाईल. हे ऐकून लेस म्हणाला मग आई तू मला ही गोष्ट आधी का नाही सांगीतलीस? आई त्याला म्हणाली की अरे घर घेतल्याचा तुझा आनंद मी पाहीला मग मला वाटले की नको आता या तक्रारीच्या मिठाचा खडा टाकून तुझा आनंद हिरावून घ्यायला. या उत्तराने लेसची थोडीशी समजूत निघाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व फर्निचर व इतर समान ट्रकमध्ये भरले गेले. ट्रक लिबर्टी सिटीमध्ये येऊन जुन्या घराबाहेर थांबला. मॅमी ब्राउनच्या मैत्रिणी मॅमीला पाहून पळतच आल्या त्यांनी मॅमीला विचारले का ग तू परत जुन्या घरी आलीस, नवीन घराचे काय झाले? मॅमी कोणताही संकोच न ठेवता सर्व घडलेली हकीकत सांगू लागली. तिच्या मैत्रिणी आपसात हळहळ व्यक्त करू लागल्या म्हणू लागल्या आता कुठे बिचारीचे चांगले दिवस आले होते तर परत एकदा याच घाण जागेत परत यावे लागले हीला. ट्रकमधील सामान खाली घेत असताना या गप्पा लेस ब्राउनच्या कानावर पडल्या, आणि त्याच्या दुःखाचा बांध फुटला तो मान खाली घालून रडू लागला.
आई म्हणाली लेस बाळा तू का रडतोयस? लेस म्हणाला बघ आई हे काय करून बसलो मी! कसली मोठी चूक झाली माझ्या हातून, मी घराची कागदपत्रे तपासायला हवी होती, असे बोलताना लेसची मान दुःखाने शरमेने खाली वाकली होती.
आई लेसला म्हणाली लेस वर बघ तुझी मान ताठ ठेव. तू चुकलास म्हणून काय झालं. अजून आयुष्यात भरपूर चुका करशील. चुकांमधून बोध घे, शहाणा हो. पण कधीही मान झुकवू नकोस. आयुष्यात भरपूर दुःखाचे,संकटाचे क्षण येतील पण डगमगू नकोस ताठ मानेने जग, ज्या संकटाने माणूस मरत नाही त्या प्रत्येक संकटाने माणूस अधिकाधिक कणखर बनत जातो.
नंतरच्या काळात हाच सामान्य कृष्णवर्णीय लेसली ब्राउन ज्याला त्याच्या शाळेने "mentaly educational retard" म्हणजे शालेय शिक्षण घेण्यास मानसिकरित्या असमर्थ जाहीर केले होते तोच लेस भविष्यात जिद्दीच्या बळावर लाखो श्रोत्यांसमोर प्रेरणादायक भाषण करू लागला, आणि असामान्य वक्ता, लेखक, विचारवंत, झाला. स्वतःच्या लेखनाच्या, वक्तृत्वाच्या बळावर त्याने लाखो लोकांचे आयुष्य बदलले. त्याने लिहिलेली पुस्तके वाचून हजारो तरुण निराशेच्या गर्तेतून बाहेर पडले. पंचाहत्तर वर्षाचा लेस ब्राउन आजही त्याच्या व्याख्यानामधून लोकांना प्रेरणा देतच आहे.
आपणही संकटाला, दुःखाला न घाबरता ताठ मानेने जगुयात, आयुष्य सुंदर आहे.जगण्याचे सुरेल गाणे करूयात.
महेश मानस...

कथा फसव्या मार्कांची आणि व्यथा विद्यार्थ्यांची

यावर्षीच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन. आपल्या पाल्यानी निश्चित चांगला अभ्यास केलेला आहे.  मात्र यावर्षी ज्...