मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी
मित्रांनो आज मी तुम्हाला एका असामान्य अवलियाची गोष्ट सांगणार आहे..
या लेस ब्राउन ची गोष्ट त्याच्याच शब्दात ऐकताना आपले डोळे पाणावतात.
1945 साली जन्मलेला हा अमेरिकन कृष्णवर्णीय लेखक, विचारवंत, मोटीवेशनल स्पीकर. लेस ब्राउनला लहानपणी जन्मदात्या आईने टाकून दिले व दुसऱ्या एका कृष्णवर्णीय गरीब स्त्रीने त्याला सांभाळले. त्या सांभाळणाऱ्या स्त्रीने जिचे नाव मॅमी ब्राउन होते तिनेच लेस ला लेसली ब्राउन हे नाव बहाल केले. मॅमी ब्राउन अतिशय मायाळू परंतु खंबीर स्त्री होती. तिने लेसली सोबत सात मुले दत्तक घेऊन सांभाळली होती.दिवसभर ती श्रीमंतांच्या घरी धुणे भांडी, स्वयंपाक करत असे. श्रीमंत लोकही घरातील उरलेले अन्न मॅमीला घरी नेण्यास देत असत. मॅमी हे मागून आणलेले अन्न खायला घालून मायेने सात लेकरे सांभाळत होती.
लेस ब्राउनला साहजिकच या पालक आईबद्दल खूप म्हणजे खूप प्रेम होते.
लेस ब्राउन ने ठरवले की आपण मोठे झाल्यावर आईच्या कष्टाचे पांग फेडायचे, आईला खुप सुखात ठेवायचे. लेस ब्राउन थोडा वयाने मोठा व्हायला लागला. अजून जगाला लेस ब्राउनची ओळख व्हायची होती. तो एक सामान्य माणसाचे आयुष्य जगत होता. थोडेसे पैसे कमवायला लागल्यावर लेस ला वाटले आईचे आयुष्य लिबर्टी सिटी सारख्या झोपडपट्टी एरियात छोट्या घरात गेले, तेंव्हा आता छान थोडेसे मोठे घर घ्यावे. म्हणून त्याने जवळच्याच उपनगरात एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर मोठे घर घेतले. तो खूप खुश होता. आईला त्याने घर दाखवले आईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.आईला घेऊन तो नवीन घरात राहायला आला. त्याच दिवशी त्याला जवळच्याच बँकेतून भेटण्यासाठी निरोप आला. त्याला बोलावण्याचे कारण समजेना तो बँकेत गेला तिथे गेल्यावर बॅंकेच्या मॅनेजरने लेस ला बसायला खुर्ची दिली व त्याला सांगितले तुम्हाला पंचावन्न हजार डॉलर भरावे लागतील तरच तुम्हाला त्या नवीन घरात रहाता येईल.पण लेस म्हणाला मी तर रोखीने पैसे देऊन घर खरेदी केलंय. मी जास्तीचे पैसे कोणाला का देऊ, तर बँकेचा आधिकारी म्हणाला घराच्या जुन्या मालकाने ते घर पंचावन्न हजार डॉलर कर्जासाठी तारण ठेवले होते तेंव्हा आता ते कर्जाचे पैसे तुम्हाला भरावे लागतील जर भरू शकणार नसाल तर तुम्हाला घर खाली करावे लागेल. लेसने घाईने त्याच्या वकिलाला बँकेत बोलावून घेतले वकील आल्यावर बँकेच्या अधिकाऱ्याने वकिलाला कर्जाच्या तारणाची कागदपत्रे दाखवली. लेस ब्राउनचा वकील म्हणाला लेस खरच तुला फसवलं गेलंय. लेस म्हणाला पण तो माणूस खूप चांगला वाटला तो म्हणाला या घरावर काहीही कर्ज नाहीये तो माणूस खरच चांगला वाटला मला, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मी, म्हणून मी घराची कागदपत्रे पाहिलीच नाहीत. बँकेतील इतर कर्मचारी लेस कडे असे पाहायला लागले जणू काही कसलं येड आहे हे. लेस आता रडकुंडीला आला. लेस म्हणाला बर पण मला घराबाहेर काढू नका मी भरतो सर्व डॉलर पण मला जरा वेळ द्या. सहा महिने वेळ द्या मला. बँकेचे अधिकारी चांगलेच आडून बसले ते म्हणाले तुला आम्ही फक्त आठ दिवस देतो त्याच्या आत तुला सर्व पैसे भरावे लागतील. अहो पण माझ्या आईची तब्येत बरी नसते हो, मला थोडा तरी वेळ द्या ना मी पाच हजार डॉलर प्रति महिना हप्त्याने तुमचे कर्ज फेडतो पण मला घराबाहेर काढू नका. हे घर माझ्या आईचे स्वप्न आहे हो तिला खूप मोठा धक्का बसेल. पण बँकेचे अधिकारी काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी शेवटची तंबी दिली एका आठवडयात पैसे द्या नाहीतर घर खाली करा. शेवटी लेस म्हणाला मग मी घरासाठी भरलेले माझे पसे तरी द्या त्याच्या या वाक्यावर सर्व बँक हसली, लेस ब्राउन सैरभैर झाला. लेसचा वकील म्हणाला तो घराचा मालक तुझे पैसे घेऊन पळून गेलाय, त्याने तुला फसवलंय. आता ते पैसे बँक कसे देईल.
लेस मनात दुःख भरून डोळे पाणावलेल्या अवस्थेत घरी आला. तिथून पुढे सहा सात दिवस तो पैसे कुठून जुळतात का हे पाहत प्रयत्न करत राहिला. एवढी मोठी रक्कम जमा होणे शक्य नव्हतेच. सातव्या दिवशी रात्री बेचैन अवस्थेत तो घराच्या दिवाणखान्यात येरझरे घालत राहीला. रात्रभर विचार करू लागला उद्या तर घर सोडावे लागेल याबद्दल आईला कसे सांगावे, रात्री तीन वाजता तो आईच्या बेडरूम जवळ गेला बाहेरून त्याने आईला आवाज दिला व आत गेला, त्याने आईला उठवून बसवले आईसुद्धा जागीच असलेली पाहून लेसने आईला विचारले तू आजून जागीच कशी ग? आई म्हणाली तू बाहेर बेचैन पणे येरझरे घालत होतास नक्कीच काहीतरी टेन्शन असेल तुला. म्हणून मलाही झोप येत नव्हती. लेस ब्राउन आईसमोर गुढग्यावर बसला त्याचे डोळे दुःखाने लाल झाले होते. आई लेसला म्हणाली न घाबरता न संकोचता मला सांग काय झालं ते, लेस म्हणाला आई उद्या आपल्याला हे घर सोडावे लागेल.आई ने विचारले का रे? लेस म्हणाला आई ज्याने मला हे घर विकले त्याने मला फसवले आहे. या घरावर पंचावन्न हजार डॉलरचे कर्ज काढले व माझे पैसे घेऊन पळून गेलाय आता बँक मला पैसे मागतीये बँकेने मला आठ दिवसात पंचावन्न हजार डॉलर भरायला सांगितले होते पण मी पैसे गोळा नाही करू शकलो. आता उद्या आपल्याला हे घर सोडावे लागेल.
लेसच्या आईचा मॅमी ब्राउनच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले.आईचा चेहरा हसरा झाला व आई म्हणाली अरे बरच झालं की मग, नाहीतरी हे घर मला आवडेलच नव्हते. दिवसभर खालून वर जाऊन यायचे म्हंटले तरी माझे घुडघे दुखून येत होते. मला गुडघ्यामुळे खाली जावसं वाटतच नव्हते. म्हणून दिवसभर मी या घरातच जेलमध्ये बंद झाल्यासारखी झाले होते. आणि इथे कोणी माझ्या मैत्रिणी सुद्धा बनत नव्हत्या. बर झालं जे झालं ते, आपण परत लिबर्टी सिटी एरियात जाऊ राहायला, तिथे माझ्या कितीतरी जुन्या मैत्रिणी आहेत ज्यांच्यासोबत माझा दिवस अगदी छान जाईल. हे ऐकून लेस म्हणाला मग आई तू मला ही गोष्ट आधी का नाही सांगीतलीस? आई त्याला म्हणाली की अरे घर घेतल्याचा तुझा आनंद मी पाहीला मग मला वाटले की नको आता या तक्रारीच्या मिठाचा खडा टाकून तुझा आनंद हिरावून घ्यायला. या उत्तराने लेसची थोडीशी समजूत निघाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व फर्निचर व इतर समान ट्रकमध्ये भरले गेले. ट्रक लिबर्टी सिटीमध्ये येऊन जुन्या घराबाहेर थांबला. मॅमी ब्राउनच्या मैत्रिणी मॅमीला पाहून पळतच आल्या त्यांनी मॅमीला विचारले का ग तू परत जुन्या घरी आलीस, नवीन घराचे काय झाले? मॅमी कोणताही संकोच न ठेवता सर्व घडलेली हकीकत सांगू लागली. तिच्या मैत्रिणी आपसात हळहळ व्यक्त करू लागल्या म्हणू लागल्या आता कुठे बिचारीचे चांगले दिवस आले होते तर परत एकदा याच घाण जागेत परत यावे लागले हीला. ट्रकमधील सामान खाली घेत असताना या गप्पा लेस ब्राउनच्या कानावर पडल्या, आणि त्याच्या दुःखाचा बांध फुटला तो मान खाली घालून रडू लागला.
आई म्हणाली लेस बाळा तू का रडतोयस? लेस म्हणाला बघ आई हे काय करून बसलो मी! कसली मोठी चूक झाली माझ्या हातून, मी घराची कागदपत्रे तपासायला हवी होती, असे बोलताना लेसची मान दुःखाने शरमेने खाली वाकली होती.
आई लेसला म्हणाली लेस वर बघ तुझी मान ताठ ठेव. तू चुकलास म्हणून काय झालं. अजून आयुष्यात भरपूर चुका करशील. चुकांमधून बोध घे, शहाणा हो. पण कधीही मान झुकवू नकोस. आयुष्यात भरपूर दुःखाचे,संकटाचे क्षण येतील पण डगमगू नकोस ताठ मानेने जग, ज्या संकटाने माणूस मरत नाही त्या प्रत्येक संकटाने माणूस अधिकाधिक कणखर बनत जातो.
नंतरच्या काळात हाच सामान्य कृष्णवर्णीय लेसली ब्राउन ज्याला त्याच्या शाळेने "mentaly educational retard" म्हणजे शालेय शिक्षण घेण्यास मानसिकरित्या असमर्थ जाहीर केले होते तोच लेस भविष्यात जिद्दीच्या बळावर लाखो श्रोत्यांसमोर प्रेरणादायक भाषण करू लागला, आणि असामान्य वक्ता, लेखक, विचारवंत, झाला. स्वतःच्या लेखनाच्या, वक्तृत्वाच्या बळावर त्याने लाखो लोकांचे आयुष्य बदलले. त्याने लिहिलेली पुस्तके वाचून हजारो तरुण निराशेच्या गर्तेतून बाहेर पडले. पंचाहत्तर वर्षाचा लेस ब्राउन आजही त्याच्या व्याख्यानामधून लोकांना प्रेरणा देतच आहे.
आपणही संकटाला, दुःखाला न घाबरता ताठ मानेने जगुयात, आयुष्य सुंदर आहे.जगण्याचे सुरेल गाणे करूयात.
महेश मानस...

No comments:
Post a Comment