यावर्षीच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन.
आपल्या पाल्यानी निश्चित चांगला अभ्यास केलेला आहे.
मात्र यावर्षी ज्या पद्धतीने सरसकट गुणांची उधळण केली आहे, त्यावरून शिक्षण मंडळाच्या उद्देशावर शंका घेण्यास वाव आहे.
हे सढळ हाताने वाटलेले हे मार्क्स म्हणजे पाल्य आणि पालकांसाठी लावलेला ट्रॅप आहे. मी तुम्हाला विनंती करेन की या ट्रॅप मध्ये अडकू नका.
नंबर्सला फसू नका. कारण सध्याचे अभियांत्रिकी विद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, मॅनेजमेंटची महाविद्यालये. ही कोणातरी राजकीय नेत्यांची, उद्योजकांची मालकीची आहेत.
आणि ही महाविद्यालये एखाद्या कारखान्याप्रमाणे चालवली जातात.ज्याप्रमाणे कारखान्यात कच्चा माल आणून त्यावर प्रक्रिया करून तो पक्का माल बनवून बाजारात विकायला पाठवला जातो तद्वतच हजारोंच्या संख्येने विद्यार्थी ऍडमिशन घेतात. आणि दरवर्षी हजारोंच्या संख्येने इंजिनियर्स, डॉक्टर, शिक्षक, एमबीए अशा पदव्या वाटप करून बेरोजगार तरुण बाजारात पाठवले जातात.या कॉलेज नामक कारखान्याला लागणारा कच्चा माल म्हणजे हे ढिगाने मार्क्स देऊन विद्यार्थी नामक पीक काढले जाते. आणि याचाच पुरवठा कॉलेजेस ला होतो.एखादया वर्षी ऍडमिशन ला विद्यार्थी संख्या घटली की हे उद्योजक, राजकीय नेते संस्थाचालक शिक्षण मंडळाला मॅनेज करतात, मग त्यावर्षी मार्कांचा पाऊस पाडला जातो. विद्यार्थी आणि पालक हे ढीगभर मार्क्स बघून हरखून जातात. मग श्रीमंत पालक आपल्या पाल्याला अशा7च कोणत्यातरी जिथे प्रवेश परीक्षा नसेल किंवा नाममात्र असेल अशा ठिकाणी संस्थाचालक मागतील ती रक्कम देऊन इंजिनियरिंगला, मॅनेजमेंटला ऍडमिशन घेऊन देतात.
बर यामध्ये गरीब पालकही मागे नसतात तेसुद्धा पाल्याचे मार्क्स बघून हुरळून गेलेले असतात मग अगदी त्यांचा स्वाभिमान वगैरे उफाळून येतो आणि म्हणतात, माझा मुलगा प्रचंड हुशार आहे, मार्क्स बघा त्याचे, मला कुठे गहाण राहण्याची वेळ आली तरी चालेल पण त्याचे उच्चशिक्षण पूर्ण करेन.
हॉस्पिटल मध्ये रुग्णाचा नातेवाईक डॉक्टरसमोर जितका हतबल असतो तितकाच किंबहुना जास्त हतबल विद्यार्थ्यांचा पालक संस्थाचालकांसमोर हतबल असतो. पालकांना सांगितले जाते बघा यावर्षी महाविद्यालयात या शाखेच्या इतक्या इतक्याच सीट्स आहेत, तुमच्या पाल्याला चांगले मार्क्स आहेत म्हणून आम्ही सहानुभूतीपूर्वक तुमचा विचार करतोय. तुम्हाला इतरांपेक्षा कमीच डोनेशन मागितले आहे. अमक्या तमक्याला तुमच्यापेक्षा खूपच जास्त डोनेशन भरायला लागले आहे. बघा तुमचा पाल्य हुशार आहे आता जास्त विचार नका करू. अशा पद्धतीने एकदाचा विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात प्रवेश होतो.
आणि मग सुरू होते विद्यार्थ्याची ससेहोलपट..
आई वडिलांनी मार्क्स पाहून प्रचंड अपेक्षा वाढवलेल्या असतात. ते स्वप्ने पाहायला चालू करतात.
शैक्षणिक वर्षाचे एक दोन सेमिस्टर अभ्यासक्रमाची ओळख होण्यात आणि नवनवीन मित्र मैत्रीण याच्यात हसत खेळत जातात. पन्नास साठ हजार रुपयांचे महागडे क्लासेस लावले जातात.
थोडा काळ सरल्यावर हळू हळू वास्तवाची जाणीव व्हायला लागते, आपली आवडनिवड, बुद्धिमत्ता, कौशल्य आणि घेत असलेले शिक्षण यात तफावत असल्याची जाणीव व्हायला लागते, तोवर एक वर्ष निघून गेलेले असते.
मग जाणवायला लागते की अरे हे शिक्षण झेपत नाहीये. इंग्रजी , किंवा गणित असे विषय डोक्यावरून जात आहेत. किंवा हे आपल्याला आवडत नाहीये. हे आपल्याला व्हायचच नाहीये. किंवा मी जास्त मार्क्स बघून चुकीचे क्षेत्र निवडून बसलोय.
मग हळूहळू ही तक्रार व्यथा बनून जाते.
यातून मग ज्यांची घरी आर्थिक सुबत्ता असेल ते खाली मान घालून आई वडिलांना व्यथा सांगून साईड बदलून घेतात आणि धोपट मार्ग म्हणून कला किंवा वाणिज्य शाखेला पहिल्या वर्षांपासून प्रवेश घेतात.
गरीब विद्यार्थी मात्र आतल्या आत घुसमटत राहतात. एकतर पालकांनी मोठ्या अपेक्षेने पोटाला चिंमटे काढून जीवाचा आटापिटा करून महाविद्यालयात डोनेशन भरून ऍडमिशन घेऊन दिलेले असते. ते ऐकून घेतील की नाही, समजून घेतील की नाही ही भीती मनात तयार होते. अभ्यासक्रमातील विषय डोक्यावरून जात असतात. मग विषय जायला लागतात.दहावीच्या मार्कांचा आणि चालू अभ्यासाचा मेळ बसत नाही. अरे आपले मार्क्स तर एवढे जास्त, आपण एवढे हुशार मग हे आपल्याला का समजत नाही, हळूहळू आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. आई वडीलांपासून मार्क्स लपवणे, मानसिक तणाव वाढणे, डिप्रेशन.. क्वचित प्रसंगी व्यसनाधीनता किंवा आत्महत्या..
हे प्रकार जर टाळायचे असतील मार्कांच्या ट्रॅप मध्ये अडकू नका.
सध्या एक ट्रेंड असा चालू आहे की विद्यार्थ्याला त्याचे करियर निवडू द्या, त्याचा निर्णय त्याला स्वतःला घेऊ द्या, पण माझ्या मते पालकांनी ज्या पाल्याला आपण जन्म दिलेला असतो ज्याला पंधरा सोळा वर्षे आपण वाढवलेला असतो त्याचे गुणावगुंण पालकांना माहीत असतात. त्याची ताकद कुठे आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत, हे आपण जाणत असतो. एकूणच आपण आपल्या पाल्याला त्याच्यापेक्षा जास्त ओळखत असतो. साधारण पंधरा वर्षे वयापर्यंत आपला पाल्य बाहेरच्या जगात पडलेला नसतो, त्याला जगाची, विविध क्षेत्रांची तितकीशी ओळख नसते.पाल्य करियर निवडतो म्हणजे काय तर मार्क्स जास्त आहेत मला मेडिकल फिल्ड मध्ये जायचंय तर मी सायन्सला जाणार, चालू ट्रेंड प्रमाणे इंजिनियरिंगला स्कोप आहे तर मी इंजिनियरिंगला जाणार, किंवा माझे मित्र मॅनेजमेंट करणार आहेत मग मी तिकडेच जाणार. हे पाल्याचे करियर किंवा शिक्षण शाखा निवडण्याचे निकष असतात.(यामध्ये काही सन्माननीय अपवाद असतील ज्यांनी अगदी अचूक स्वतःला साजेशी शिक्षण शाखा निवडली)
एकंदर हा लेख लिहिण्याचा मूळ उद्देश हाच आहे की हे आपल्या पाल्याचे मार्क्स फसवे तर नाहीत ना हे एकदा कठोर परीक्षण करून घ्या. केवळ मार्क्स वरती त्याचे करियर न ठरवता त्याची आवड, त्याचे कौशल्य, त्याची बुद्धिमत्ता, त्याच्या मर्यादा या सर्व बाबींची सांगड घालून त्याच्यासमोर विविध पर्याय ठेवा. मग त्यातून त्याला निवड करू द्या. यातून पाल्य जी निवड करेल त्या वाटेने जाताना तो आवडीने व जिद्दीने करियर करून स्वतःचे भविष्य घडवेल.
पुन्हा एकदा पाल्य व पालकांचे अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..
महेशमानस..
Reality.
ReplyDelete