अकियो मोरीता..
दहाएक दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी न्यूज मीडिया समोर लोकांना संबोधीत करत होते. त्यावेळी त्यांनी उद्योजकांना विनंती केली की सध्या कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला कठीण काळ आलेला आहे. उद्योगांना काही दिवस मंदीचा सामना करावा लागेल तरीही मानवतावादी दृष्टिकोन ठेवून उद्योजकांनी कामगारांना कामावरून कमी करू नये.
मोदींनी त्यांच्या परीने विनंती केली.
मोदींचे भाषण संपते ना संपते तोवरच एका मराठी न्यूज चॅनेलने उद्योग जगतातील काही तज्ज्ञ मंडळी बोलावली व मोदींच्या या आवाहनावर सविस्तर चर्चा घडवून आणली.
त्यातील एक औद्योगिक धोरणांमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीचे मत होते की व्यवसाय हृदयाने करता येत नसून डोके लावून करावा लागतो. उद्योग व्यवसाय करायचा म्हणजे प्रॅक्टिकल राहावे लागते. कमी उत्पन्नासाठी जास्त मनुष्यबळ लावणे आणि उद्योगाच्या मंदीच्या काळात आवश्यकतेपेक्षा जास्त मनुष्यबळ वापरणे म्हणजे बॅड बिजनेस असे त्या तज्ज्ञांचे मत होते.
मला या औद्योगिक क्षेत्राबद्दल व अर्थव्यवस्थेबद्दल अगदी जुजबी ज्ञान आहे. त्यामुळे या तज्ज्ञांचे मत मला खोडून वगैरे काढायचे नाही. पण हे चर्चासत्र पाहिल्यानंतर मला माझ्या वाचनात आलेल्या एका जपानी उद्योजकाची आठवण झाली. त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो.
इसवी सनाचे विसावे शतक उजाडले आणि उगवत्या सूर्याच्या देश जपानला जाणीव झाली की पाश्चिमात्य जगातील साम्राज्यवादाचे आणि भांडवलवादाचे आक्रमण थोपवायचे असेल तर आपला देश सर्व औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असायला हवा.म्हणून जपानच्या सम्राटाने तेथील श्रीमंत लोकांना उद्योग व्यवसायात उडी घेण्याचे आवाहन केले.
जपानी सम्राटाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो लोक उद्योग उभारायला लागले. त्यापैकीच एका सामुराई घराण्यातील तरुणाने 1926 साली आपल्याजवळचे सर्व भांडवल वापरून रेडियोचा एक छोटेखानी कारखाना काढला.
सुरुवातीला अगदी 20 ते 25 लोकांचे युनिट उभे केले. उद्योग जरा कुठे उभाच राहत होता तोवर अमेरिकेच्या कृपेने जगावर ग्रेट डिप्रेशन म्हणजेच जागतिक महामंदीचे संकट उभे राहिले. तोपर्यंत जपानही जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनल्याने या जागतिक महामंदीची झळ थेट जपानी अर्थव्यवस्थेला बसली. जपानचे शेकडो उद्योग तोट्यात जायला लागले. हळूहळू बंद पडायला लागले.
या सामुराई तरुणाला काही मित्रांनी व औद्योगिक क्षेत्रातील माहीतगारांनी सल्ला दिला की काही दिवस तुझ्या कामगारांना ले ऑफ दे, म्हणजेच तात्पुरते थोडे दिवस बिनपगारी घरी बसव. परिस्थिती जर नाहीच सुधारली तर त्यांना परत नको बोलावू आणि जर परत चांगले दिवस आले तर त्यांना परत बोलव.
त्यावर हा सामुराई म्हणाला मी जर या कामगारांच्या कुटुंबाची भविष्यातील चरितार्थाची हमी देऊ शकत नसेल तर मी त्यांना कामावरून घरी बसवू शकत नाही.
मी अन्नाचा शेवटचा घास खाईपर्यंत माझे कामगार माझ्यासोबत जेवतील. हे कामगार म्हणजे माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत.आणि यांना उपाशी ठेवण्यापेक्षा मी हाराकीरी करेन.( हाराकीरी ही स्वाभिमानी सामुराई लोकांची एक भयंकर परंपरा आहे. एखादी अक्षम्य चूक झाली असेल किंवा युद्धात पराजय झाला असेल तर भर चौकात गुडघ्यावर बसून स्वतःच्या हातात तलवार घेऊन स्वतःच बेंबीपासून पोट फाडत कडेपर्यंत तलवार आणायची आणि शांतपणे वेदना सहन करत मृत्यू स्वीकार करायचा.)
स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून या तरुणाने कामगार काही काढले नाहीत किंवा घरी पाठवले नाहीत. वेळप्रसंगी स्वतः नफा न कमावता कामगारांचे वेतन जमेल तसे देत राहिला. रेडिओचा कारखाना सुद्धा कसाबसा तग धरून राहिला. 1932 ते 33 च्या दरम्यान महामंदी हटली जपानी उद्योगधंदे पुन्हा जोमाने चालायला लागले. कामगारांना आपल्या मालकाने केलेल्या उपकाराची जाणीव होती. त्यांनी जीव ओतून कारखाना वाढवला. 1946 साल येता येता या छोट्या कारखान्याचे रूपांतर कंपनीत झाले. नंतर नंतर या कंपनीने इतर इलेकट्रोनिक उपकरणांचे उत्पादन सुरू केले.
थोड्याच अवधीत ही कंपनी इलेकट्रोनिक उत्पादनात जगात क्रमांक एकची कंपनी झाली.उत्पादनाच्या दर्जाच्या बाबतीत जपानच काय पण युरोप अमेरिकेतील कंपन्यांनाही या कंपनीच्या जवळपास सुद्धा जाता आले नाही. आजही जगभरात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील सर्वात बलाढ्य कंपनी म्हणून या कंपनीला ओळखले जाते.
इथपर्यंत वाचता वाचता तुम्हाला ही कंपनी कोणती ते समजले असेलच. नसेल लक्षात आले तर सांगतो ही जपानी इलेक्ट्रॉनिक कंपनी म्हणजे #सोनी_कॉर्परेशन आणि या कंपनीचा मालक म्हणजे आकीयो मोरिता.
मला वाटते की आकीयो मोरिता ने ज्याप्रमाणे संकटकाळी आपल्या कामगार कुटुंबाचा हात न सोडता घट्ट धरून ठेवला त्याप्रमाणे भारतीय उद्योजकांनी आपल्या कामगारांना अशा कठीण काळात बेरोजगारीच्या दरीत न लोटता त्यांना विश्वासात घेऊन पूर्ण वेतन किंवा अर्धे वेतन देऊन जमेल तसे त्यांचा सांभाळ करायला हवा. नंतर हेच कामगार पूर्ण निष्ठेने तुमचा उद्योग व्यवसाय भरभराटीला आणतील.
मला वाटते की माणूस नेहमीच डोक्याने विचार करतो. त्याने कधीतरी ह्रदयातून आलेल्या आवाजाचाही विचार करावा.
महेशमानस...
सद्यस्थितीला अनुरूप माहिती आहे.👍
ReplyDeleteखरंर,कठीण काळातच माणुसकीची परीक्षा होते.ह्रदयापासून केलेले काम तुम्हाला मोठे बक्षिस देते.
ReplyDeleteKhup chaan mama अप्रतीम
ReplyDeleteManaging business is all about managing people
Chatrapati shivarayani sudhaa hech kela & Sir Ratan Tata also
Most Impaort. This blog made my day😊 keep it up mama